नवी दिल्ली : किडनीच्या आजाराने आपल्याला ग्रासलं असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरवरुन दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा पुढील आठवड्यातील लंडन दौराही रद्द करण्यात आला.
''माझ्या किडनीचा आजार आणि काही इंफेक्शनचा उपचार सुरु आहे. त्यामुळे सध्या घरातूनच सुरक्षित वातावरणात कामकाज करत आहे. पुढील उपचाराबाबत माहिती डॉक्टर देतील,'' असं ट्वीट अरुण जेटलींनी केलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, अरुण जेटलींच्या प्रकृतीची सध्या तपासणी केली जात आहे. डॉक्टरांनी जे संकेत दिले आहेत, त्यानुसार त्यांना किडनीच्या आजाराने ग्रासलेलं आहे. जेटलींना अजून रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं नाही, मात्र इंफेक्शन होऊ नये यासाठी बैठकींना जाण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे.
जेटली सोमवारपासून घरीच असल्यामुळे ते कार्यालयातही जात नाहीत. पुन्हा एकदा राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अजून त्यांनी खासदारकीची शपथही घेतलेली नाही.
राज्यसभा खासदार म्हणून त्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजीच संपला. उत्तर प्रदेशातून ते राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत.