नवी दिल्ली : यापुढे कुणालाही ई-वॉलेट, नेट बँकिंग किंवा डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बिटकॉईनसारख्या क्रिप्टो करन्सीची खरेदी करता येणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत आदेश जारी केले आहेत. तर आरबीआयने स्वतःचीच डिजीटल करन्सी जारी करण्यासाठी एका सल्लागार समितीची नियुक्ती केली आहे.


बिटकॉईन खरेदीच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार आणि फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने हे निर्देश दिले. सर्व ई-वॉलेट कंपन्या आणि बँकांना या व्यवहारासाठी मनाई करण्यात आली आहे. यामुळे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी मदत होईल, असं आरबीआयचं म्हणणं आहे.

आरबीआयची स्वतःचीच डिजीटल करन्सी

आरबीआयने एका समितीची नियुक्ती केली. ही समिती आरबीआयने स्वतःच डिजीटल करन्सी जारी करण्याबाबत सल्ला देणार आहे. आरबीआय जे डिजीटल नाणं जारी करणार आहे, त्यामुळे कागदी चलन छापण्याचा खर्च वाचणार आहे. मात्र ही व्हर्च्युअल करन्सी कधी येईल, याबाबत काहीही सांगण्यात आलं नाही.

सरकारने यापूर्वीही बिटकॉईनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. बिटकॉईन हे आरबीआयचं अधिकृत चलन नाही, त्यामुळे यापासून दूर रहावं, असं आरबीआयनेही म्हटलं होतं.

काय आहे बिटकॉईन?

बिटकॉईन हे एक नवं डिजीटल चलन आहे. कॉम्प्युटर नेटवर्किंगवर आधारित व्यवहारांसाठी याची निर्मिती झाली.

2009 मध्ये याचा शोध सातोशी नाकामोतो नावाच्या एका जपानी इंजिनियरने लावला.

बिटकॉईनसाठी खरेदी केल्यानंतर कॉप्युटर किंवा मोबाईलवर त्याचे इ वॉलेट तयार होतं.

या प्रणालीमध्ये एक व्यक्ती एकपेक्षा जास्त वॉलेट तयार करु शकतात.

याचा वापर ईमेलप्रमाणे केला जातो. पण यात फरक केवळ इतकाच आहे की, याचा पत्ता केवळ एकदाच वापरता येतो.

याचा वापर केवळ ऑनलाईन पद्धतीनेच करता येतो. तसेच याचं नियंत्रण कोणत्याही एका अधिकृत संस्थेकडे किंवा सरकारकडे नाही.

सध्या बिटकॉइनचं मूल्य भारतीय चलनानुसार तब्बल 70 हजारापेक्षा जास्त आहे.

संबंधित बातम्या :

एक कोटी गुंतवले, 114 कोटी मिळवले, बिग बी मालामाल


बिटकॉईन गुंतवणुकीतून फसवणूक, पुण्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त


नांदेडमध्ये बिटकॉईन कंपनीचा अनेकांना कोट्यवधींचा गंडा, गुन्हा दाखल


बिटकॉईन इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली नागपूरकरांची घोर फसवणूक


बिटकॉईनपासून दूर राहा, आरबीआयचा सल्ला


बिटकॉईनमधली गुंतवणूक पोंझी स्कीमसारखी : अर्थ मंत्रालय


बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर संकट, आयकर विभागाकडून नोटिसा