“मी रोज संसदेत जातो. जर संसदेचं कामकाज होत नाही, तर ही माझी चूक आहे का? मी राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला प्रतिनिधी आहे. त्यामुळे ते जोपर्यंत सांगत नाहीत, तोपर्यंत मी माझं वेतन आणि भत्ते का नाकारु?” असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी विचारला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या गोंधळामुळे दोन्ही सदनाचं कामकाज होऊ शकलं नाही. त्यामुळे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन, वेतन आणि भत्ते नाकारण्याची घोषणा केली. पण भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी वेतन आणि भत्ते नाकारण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी काँग्रेसच्या राजकारणामुळे राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज झालं नसल्याचा आरोप यावेळी केला. तसेच, काँग्रेसच्या भूमिकेमुळे देशभरातील करदात्यांचा पैसे वाया जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, बुधवारी अन्नाद्रमुकच्या खासदारांनी गोंधळ घातल्याने संसदेचं कामकाज 20 व्या दिवशीही होऊ शकलं नाही. लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर, अन्नाद्रमुकचे खासदार वेलमध्ये येऊन कावेरी पाणीवाटपासंदर्भात बोर्डाची स्थापना केल्यावरुन घोषणाबाजी सुरु केली.
यानंतर दुपारी पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली. पण तेव्हाही विरोधी पक्षांनी गोंधळ घातल्याने, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
संबंधित बातम्या
एनडीएचे खासदार या अधिवेशनातील पगार-भत्ते घेणार नाहीत!