Forged PMO Official: पंतप्रधानांचा वैयक्तिक सल्लागार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) फौजदारी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी 2021 मध्ये या व्यक्तीच्या विरोधात पीएमओने स्वत: तक्रार केली होती. असं असलं तरी सीबीआयने वर्षभरानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.


सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पंतप्रधान कार्यालयातील सहाय्यक संचालक पीके इस्सार यांनी 9 जुलै 2021 रोजी पीएमओच्या लेटरहेडवर सीबीआयकडे तक्रार केली होती. पीएमओने दिलेल्या या तक्रारीत असे म्हटले आहे की, केरळमधील एक व्यक्ती, ज्याचे नाव डॉ. शिवकुमार आहे, तो स्वत:ला पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित असल्याचे सांगतो. यासोबतच हा व्यक्ती कोणालाही आपल्या मोबाईलवरून फोन करतो, तेव्हा त्याला आपली पंतप्रधानांचा वैयक्तिक सल्लागार म्हणून ओळख करून देतो. एका छापील लेखात त्यांनी स्वतःला भारतीय पंतप्रधानांचे आरोग्य सल्लागार असल्याचेही सांगितले आहे.


वर्षभरानंतर पीएमओच्या तक्रारीवरून सीबीआयने कारवाई केली


पीएमओने सीबीआयला दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, सुरुवातीला हे प्रकरण स्वतःला पीएमओ अधिकारी म्हणून खोटी ओळख करून देण्याचे आहे. पीएमओने सीबीआयला या प्रकरणी अधिकृत तक्रार नोंदवून कायद्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. पीएमओने 9 जुलै 2021 रोजी ही तक्रार सहसंचालक धोरण, सीबीआय यांना दिली होती. मात्र पीएमओच्या तक्रारीला न जुमानता या प्रकरणात फौजदारी खटला नोंदवण्यास सीबीआयला पूर्ण वर्ष लागले आहे.


आयपीसी कलम 170 अन्वये गुन्हा दाखल


सीबीआयच्या एफआयआरनुसार, या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची तारीख 28 जून 2022 आहे आणि कलम 170 आयपीसी अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी सेवक नसताना आपली तशी खोटी ओळख करून दिल्याने कलम 170 IPC अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआय एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की, हा गुन्हा 2019 पासून होत असून दिल्लीशिवाय इतर ठिकाणीही याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास दिल्लीतील सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.