नवी दिल्ली: देशातील एटीएम आणि बँकांबाहेरील रांगा कमी करण्यासाठी आता सरकारनं नवी घोषणा केली आहे. देशातील काही ठराविक पेट्रोल पंपावर 2 हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. पहिल्या टप्प्यात अडीच हजार पेट्रोल पंपावर ही सुविधा सुरु करण्यात येईल. या निर्णयानं नागरिकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
सुरुवातीला अडीच हजार पेट्रोल पंपवर ही सुविधा असणार आहे. त्यानंतर जवळपास 20 हजार पेट्रोल पंपावर पैसे काढण्याची सोय करण्यात येणार आहे.
- कोणत्या पेट्रोल पंपवर आणि कसे काढता येणार पैसे:
पेट्रोल पंपवर 2000 पर्यंत रक्कम काढता येणार आहे. आरबीआय आणि एसबीआय संयुक्तपणे ही मोहीम राबविणार आहे. ज्या पेट्रोल पंपावर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या पीओएस (कार्ड स्वाईप मशीन) आहेत तिथेच ही सुविधा असणार आहे. सुरुवातीला 2500 पेट्रोल पंपावर पैसे काढता येणार आहे.
* आपलं एटीएम कार्ड स्वाईप केल्यानंतर पेट्रोल पंपकडून तुम्हाला दोन हजारापर्यंतची रक्कम मिळू शकते.
* यानंतर ही सुविधा आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बँकांची पीओएस असलेल्या पंपावरही ही सुविधा सुरु होणार आहे.
- 24 नोव्हेंबरपर्यंत जुन्या 500-1000च्या नोटा स्वीकारण्याचे आदेश:
रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियानं ही सुविधा सुरु केली आहे. त्याचबरोबर 24 नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळं एटीएम बाहेरच्या रांगा काही प्रमाणात कमी होतील.