नवी दिल्ली : केंद्र सरकारने फास्टॅगबाबत वाहनचालकांना काहीसा दिलासा दिला आहे. आता 15 फेब्रुवारीपर्यंत वाहनांमध्ये फास्टॅग लावता येऊ शकतं. रस्ते पहिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली फास्टॅगद्वारे अनिवार्य करण्याची मुदत वाढवली आहे. केंद्र सरकारने टोलनाक्यावर टोल वसुली सोपी आणि सुरक्षित बनवण्यासोबतच वाहतूक कोंडीतू मुक्तता व्हावी यासाठी चारचाकी वाहनांनासाठी 1 जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य केलं होतं. परंतु वाहचनालकांना फास्टॅग मिळण्यात येणाऱ्या अडचणी पाहता केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवली आहे.


भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घोषणा केली होती की, "1 जानेवारी 2021 पासून देशाचे सर्व राष्ट्रीय मार्गांवरील टोलनाके कॅशऐवजी फास्टॅग लेनमध्ये रुपांतरीत होती. जर एखादा वाहनचालक फास्टॅगशिवाय टोलनाक्यावर आला तर त्याला दुप्पट टोल द्यावा लागेल." परंतु आता फास्टॅग घेण्यासाठी आणि लावण्यासाठी वाहनचालकांना दीड महिन्यांची मुदत मिळाली आहे.




सध्या फास्टॅगद्वारे टोलनाक्यावरील वसुली 75 ते 80 टक्के आहे. रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र लिहून सल्ला दिला आहे की,त्यांनी 100 टक्के कॅशलेस टोल वसुलीसाठी आवश्यक मंजुरी घेऊन ते 15 फेब्रुवारीपासून लागू करावं.

फास्टॅग कसा खरेदी करायचा?
फास्टॅगची सुरुवात 2016 मध्ये झाली होती. फास्टॅग ही टोल भरण्याची इलेक्ट्रॉनिक, संपर्करहित यंत्रणा आहे. वाहनचालकांच्या सोयीसाठी टोलनाक्यावर विविध बँकांचे एजंट आणि एनएचएआयमार्फत काऊंटर लावण्यात आले आहेत. वाहनाची आरसी आणि परवाना किंवा आधार कार्ड दाखवत फास्टॅग खरेदी करु शकतात. त्याशिवाय काही बँका आणि पेमेंट्स बँकांच्या माध्यमातूनही तुम्ही फास्टॅग खरेदी करु शकता. बँकांच्या माध्यमातून खरेदीसाठी तुम्हाला या बँकांच्या वेबसाइटवर जावं लागेल. पेटीएम किंवा एअरटेल पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून खरेदी करायचा असेल, तर त्यांच्या फोन अ‍ॅप्सद्वारेही खरेदी करता येऊ शकेल.