Rail Roko Andolan LIVE: तीन कृषि कायद्यांविरोधात सुरु असलेलं शेतकरी आंदोलन आता आणखी आक्रमक झालं आहे. आज संयुक्त किसान मोर्चानं देशभर रेल्वे रोकोचं आंदोलन पुकारलं आहे. आज देशभरात सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रेल्वे रुळांवर धरणे प्रदर्शन करत ट्रेन रोखल्या जाणार आहेत, असं सांगण्यात आलं आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लखनौमध्ये 144 अंतर्गत संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे की, हे आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. संपूर्ण देशातील लोकांना माहिती आहे की, आपल्याला रेल्वे कुठं रोखायची आहे. भारत सरकारनं आमच्याशी या संदर्भात अद्याप काहीही चर्चा केलेली आहे.
शेतकरी नेते गुरमान सिंह चढूनी यांनी आवाहन केलं आहे की, शेतकरी बांधवांनी स्टेशन्सच्या जवळ जाऊन ट्रेन्स रोखाव्यात. त्यांनी सांगितलं की, तीन कृषि कायद्यांना रद्द करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदा, आणि लखीमपूर खिरी हत्याकांड प्रकरणी गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या अटकेच्या मागणीसाठी रेल रोको आंदोलन पुकारलं आहे.
शेतकऱ्यांना टोपी घालण्याबाबत शरद पवार आणि नरेंद्र मोदींचं एकमत, राजू शेट्टींची घणाघाती टीका
केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या (Agriculture Bill) विरोधात संयुक्त किसान मोर्चानं (Samyukta Kisan Morcha) 27 सप्टेंबरला 'भारत बंद' (bharat bandh) पुकारला होता. या बंदला अनेक राजकीय पक्ष, कामगार संघटना, शेतकरी संघटनांसह बँकिंग संघटनांनी देखील पाठिंबा दिला होता.
रेल्वे अलर्टवर
आंदोलनामुळं रेल्वे प्रवाशांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खासकरुन उत्तरेकडील रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार रेल्वेची संपत्ती आणि नुकसान वाचवण्यासाठी आरपीएफला देखील अलर्ट राहण्याचं सांगण्यात आलं आहे.
संयुक्त किसान मोर्चाकडून सोनीपत जंक्शन रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तर हरियाणाच्या बहादुरगडमध्ये आंदोलनकर्ते प्रदर्शनकारी रेल्वे ट्रॅकवर बसले आहेत. अमृतसरच्या देवी दासपुरा गावात देखील शेतकरी हे रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करत आहेत.