नवी दिल्ली : शेतकरी संघटनांच्या वतीनं आज दिल्लीत जंतर-मंतरवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, 'शेतकरी संसद' आयोजित करण्यात येणार आहे. आज म्हणजेच, 22 जुलैपासून दररोज सिंघू सीमेवरुन 200 आंदोलक शेतकरी जंतर-मंतरवर दाखल होतील. यापूर्वी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत एका शेतकरी नेत्यानं म्हटलं की, "शेतकरी नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन शांततेत पार पडले, यापैकी एकही शेतकरी संसदेत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात व्यत्यय आणणार नाही." अशातच दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना अटी-शर्थींसह परवानगी दिली आहे. 


दिल्ली पोलिसांच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, शेतकऱ्यांना जंतर-मंतरवरील आंदोलनासाठी काही अटी-शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, संयुक्त शेतकरी मोर्चाच्या वतीनं 200 हून अधिक शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार नाहीत. तसेच सहा व्यक्ती किसान मजूर संघर्ष समितीतील असतील. 


आंदोलक शेतकरी सिंघू बॉर्डरवरुन बसने जंतर-मंतरवर पोहोचतील. त्यांना कोरोनाच्या नियमांचं पालन करत आंदोलनात सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे. आंदोलनाबाबत दिल्ली पोलीस म्हणाले की, "शेतकऱ्यांचं आंदोलन शांततेत पार पडावं यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत."


दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी ऑगस्टपर्यंत अधिकाधिक 200 शेतकऱ्यांद्वारे आंदोलन करण्याची विशेष परवानगी दिली आहे. तसेच संयुक्त शेतकरी मोर्चाने सांगितलं की, संसदेचं पावसाळी अधिवेशन जर 13 ऑगस्टला संपलं तर जंतर-मंतरवरील त्यांचं आंदोलनही 13 ऑगस्टपर्यंतच सुरु राहिल. 


तसेच अमेरिकेनं भारतात आपल्या नागरिकांसाठी एक सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये नवी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सुरक्षेची काळजी घेण्यासोबतच गर्दीची ठिकाणांपासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pegasus Spyware : संसदेच्या बाहेरही सरकारला घेरणार; पेगॅसस प्रकरणी काँग्रेसचे देशभर पत्रकार परिषदांचे आयोजन