Burevi Cyclone : केरळमध्ये 'बुरेवी' चक्रीवादळ धडकणार असून ते शुक्रवारपर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाचा धोका पाहता संपूर्ण राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अधिकाऱ्यांमी राज्यावर येत असलेल्या नैसर्गिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी 2000 हून अधिक मदत शिबिरे उघडली आहेत. तर 5 डिसेंबरपर्यंत समुद्रात मासेमारी करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. तसेच 'बुरेवी' चक्रीवादळाचा धोका पाहता तमिळनाडूतही प्रशासनाने खबरदारी म्हणून अलर्ट जारी केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत बातचित केली आणि त्यांना केंद्र सरकार सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, 'आम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली आहे. आम्ही राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येत असलेल्या सर्व उपाययोजनांची माहिती दिली.
मुख्यमंत्री विजयन बोलताना म्हणाले की, आयएमडीने अंदाज वर्तवला आहे की, तिरुअनंतपुरम, कोल्लम, पथनमथिट्टा, कोट्टायम, अलप्पुझा, इडुक्की आणि एर्णाकुलम जिल्ह्यांमध्ये तीन ते पाच डिसेंबर दरम्यान मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारे वाहतील असा अंदाज वर्तवला आहे.
NDRF च्या 8 टीम केरळमध्ये दाखल
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बोलताना सांगितलं की, बुरेवी चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन, 175 कुटुंबांतील 697 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच 2489 इतर शिबीरांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यात एनडीआरएफच्या 8 टीम दाखल झाल्या आहेत. एअरफोर्स आणि नेव्ही रेस्कू ऑपरेशन्स, तसेच बचावकार्यासाठी तयार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून शक्य तेवढी मदत करण्याचं आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी तमिळनाडू आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसोबत बातचित केली. त्यांनी बुरेवीमुळे केरळ आणि लगतच्या राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना केंद्राकडून शक्य तेवढी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.