नवी दिल्ली: संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आज दिल्लीत चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करु नये म्हणून सरकारच्या वतीनं दिल्लीच्या सीमांवर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत, रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी भिंती उभा करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या उपायांवर आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी टीका केली आहे.


दिल्ली सीमेवर सुरक्षा रक्षकांनी प्रचंड बंदोबस्त वाढवला आहे. मोठ्या प्रमाणावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्यावर प्रियांका गांधी यांनी एक ट्वीट केलं असून त्यात म्हटलं आहे की, "या भयाच्या भिंती बांधून भीती का दाखवता." या ट्वीटसोबत प्रियांका गांधी यांनी एक फोटोही शेअर केला असून त्यामध्ये दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेट्स दिसतात.





Farmers Protest: सरकार आणि आंदोलकांनी संयम बाळगावा; संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाचे आवाहन


प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली आहे. प्रियांका गांधी यांनी या आधीही केंद्र सरकारवर टीका करताना सरकार शेतकऱ्यांना दहशतवादी समजतंय असा आरोपही केला होता. दिल्ली हिंसाचारानंतर काही पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरही टीका करताना प्रियांका गांधींनी म्हटलं होतं की, "शेतकरी आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांवर आता देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. अनेक ठिकाणचे इंटरनेट बंद करण्यात येत आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते विसरतात की शेतकऱ्यांचा आवाज जेवढ्या प्रमाणात दाबला जाईल त्यापेक्षा जास्त प्रमाणात सरकारच्या अत्याचाराविरोधातील आवाज वाढत जाईल."


शेतकऱ्यांचा आज चक्का जाम
संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज 'चक्का जाम' करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे की, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये चक्‍का जाम होणार नाही, मात्र या दोन्ही राज्यांमध्ये एक लाख शेतकरी स्टॅंडबायमध्ये असतील.


शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रोचे अनेक स्टेशन बंद करण्यात आले आहेत.


मोदी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय, पण.... प्रियांका गांधींचा हल्लाबोल