नवी दिल्ली : जवळपास महिन्याभरापासून सुरु असणाऱ्या (Farmers Protest) शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीसाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ निघालेलं असतानाच त्यापूर्वीच पोलिसांच्या कारवाईमुळं तणावाची परिस्थिती निर्माण धाली. राष्ट्रपती भवनाच्या दिशेनं निघालेल्या काँग्रेस खासदार आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी पक्ष मुख्यालयापाशीच रोखलं आणि सदर परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं.


काँग्रेस महासचिव (Priyanka Gandhi) प्रियंका गांधी यासुद्या कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पण, पोलिसांनी कारवाई करत त्यांनाही ताब्यात घेतलं आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत देशातील सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. माध्यमांशी संवाद साधतेवेळी देशात रितसरपणे निवडून आलेल्या खासदारांना राष्ट्रपतींची भेट घेण्यापासून रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेचा त्यांनी कडाडून विरोध केला.


'आपण लोकशाही राष्ट्रात राहतो आणि ते (आंदोलनकर्ते) हे रितसरपणे निवडून आलेले खासदार आहेत. त्यांना राष्ट्रपतींची भेट घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ज्यासाठी त्यांना परवानगी मिळालीच पाहिजे. यासाठी हरकत का असावी? सध्याचं सरकार हे दिल्लीच्या सीमेवर असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचं म्हणणंच ऐकत नाहीय', असं त्या म्हणाल्या


देशातील शेतकऱ्यांना देशविरोधी म्हणणारं भाजप सरकार आणि त्यांचे समर्थकच पापी आहे, असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी काँग्रेसलेखी भाजपची नेमकी भूमिका काय हे आधी त्यांनी स्वत: ठरवावं असं म्हणत गांधी यांनी उपरोधिक टीकाही केल्याचं पाहायला मिळालं.








आधी स्वत:च नक्की ठरवा....


विरोधी पक्षाच्या बाकावर असणाऱ्या काँग्रेसलेखी भाजपच्या भूमिकेबाबत सांगताना त्या म्हणाल्या, 'कधी ते (भाजप नेते आणि समर्थक) आम्ही (काँग्रेस नेते आणि समर्थक) विरोधक म्हणून कमकुवत आहोत असं म्हणतात. तर कधी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकऱ्यांना एकवणारे आम्ही अधिक बलशाली असल्याचं म्हणतात. आता त्यांनीच स्वत: सर्वप्रथम ठरवावं की आम्ही आहोत तरी कोण'.


सरकारविरोधी कोणतीही भूमिका ही सध्या दहशतवादी दृष्टीकोनातूनच पाहिली जाते याचा निषेध करत गांधी यांनी काँग्रेसचं हे आंदोलन फक्त आणि फक्त देशातील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थच पुकारण्यात आलं होतं, हे स्पष्ट केलं.