Farmers Protest अर्थात कृषी कायद्याविरोधात देशात सुरु असणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी Congress काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला जाण्याचा निर्णय़ घेतला. याच धर्तीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धडक मोर्चाही काढला. ही एकंदर परिस्थिती पाहता काँग्रेस मुख्यालयाबाहेर कलम 144 लागू करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यात पुढाकारानं सहभाग घेताना दिसले.


दरम्यान, ज्या पद्धतीनं काँग्रेसनं आंदोलनाचा कार्यक्रम आखला होता, त्या पार्श्वभूमीवर पोलीसही त्यांच्या बळाचा वापर करताना दिसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, गुलाम नबी आझाद आणि अधिररंजन चौधरी यांना आंदोलनाची, राष्ट्रपतींच्या भेटीची परवानगी होती. पण, काँग्रेस मुख्यालयात जमणाऱ्या खासदारांचा अंदाज पाहता तिथं पोलिसांनी या भागात कलम 144 लागू केलं.


आंदोलनकर्ते काँग्रेस खासदार विजय चौकमध्येच थांबणार होते. पण, त्यांना मुख्यालयातच थांबवण्यात आलं. पोलिसांच्या बळावर ही कारवाई करण्यात येत असल्यामुळं खासदारांमध्ये कमालीचा संताप आणि नाराजी पाहायला मिळत आहेत. मुख्य म्हणजे पोलिसांनी काँग्रेस आंदोनाच्या धर्तीवर सदर भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती. ज्यानंतर काही खासदारांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. एएनआयच्या वृत्तानुसार प्रियंका गांधींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.





एकिकडे खासदारांना ताब्यात घेतलं असल्यामुळं आता काँग्रेसचे फक्त तीन नेते राष्ट्रपतींना निर्धारित वेळेत भेटू शकणार आहेत.


दरम्यान, राष्ट्रपती भवनापर्यंत आंदोलन करण्याची परवानगी न मिळाल्यामुळं 10 जनपथपाशीच काँग्रेस आंदोलकांनी ठिय्या मांडला. यावेळी इथं काँग्रेस महासचिव प्रियंका गांझी यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. माध्यमांशी संवाद साधतेवेशी गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले.


काय म्हणाल्या प्रियंका गांधी ?


कृषी कायद्यांविरोधात आक्रमक भूमिकेत ठिय्या आंदोलन करतेवेळी (priyanka gandhi) प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधाला. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या खासदारांबाबतीत पोलिसांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.


'आपण लोकशाही राष्ट्रात राहतो आणि ते (आंदोलनकर्ते) हे रितसरपणे निवडून आलेले खासदार आहेत. त्यांना राष्ट्रपतींची भेट घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ज्यासाठी त्यांना परवानगी मिळालीच पाहिजे. यासाठी हरकत का असावी? सध्याचं सरकार हे दिल्लीच्या सीमेवर असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचं म्हणणंच ऐकत नाहीय', असं त्या म्हणाल्या.