नवी दिल्ली : सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हमीभावाचं आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारविरोधात राजधानीत संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी एकवटण्याचा निर्धार केला आहे. हमीभावासंदर्भात 20 नोव्हेंबरला देशभरातले शेतकरी दिल्लीत धडक देणार आहेत.

आज यासंदर्भात विविध राज्यातल्या शेतकरी नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासह योगेंद्र यादव उपस्थित होते.

सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक नफा देऊ, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातल्या अखिल भारतीय किसान समितीनं हमीभावासाठी मंदसौरमधून मोठी पदयात्रा काढली होती. त्याच पार्श्वभूमीवर या आंदोलनाला आता व्यापक स्वरुप दिलं जाणार आहे.