दिल्लीत बळीराजाचा एल्गार, देशभरातील शेतकरी एकवटणार
एबीपी माझा वेब टीम | 20 Nov 2017 07:44 AM (IST)
या आंदोलनाच्या निमित्ताने देशातील 182 शेतकरी संघटना पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. सुमारे दहा लाख शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा संघटनांनी केला होता.
नवी दिल्ली : देशभरातील शेतकरी आज राजधानी दिल्लीत धडकणार आहेत. शेतमालाचा हमीभाव, कर्जमुक्ती, शेतीचं धोरण, शाश्वत शेतीची खात्री, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी इत्यादी प्रमुख मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत मोर्चा काढणार आहेत. या आंदोलनाच्या निमित्ताने देशातील 182 शेतकरी संघटना पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. सुमारे दहा लाख शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा संघटनांनी केला होता. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या (एआयकेएससीसी) अध्यक्षतेखाली देशातील शेतकरी या दोन दिवसीय आंदोलनात सहभागी होणार आहेत. शेतकरी आज सकाळी दहा वाजता रामलीला मैदानातून पदयात्रा करत संसद मार्गावर पोहोचतील आणि त्यानंतर तिथे 11.30 वाजता सभा होईल. या मोर्चादरम्यान, एआयकेएससीसी किसान मुक्ती संसदेचं आयोजन करेल. तर आज दोन मागण्यांसह विधेयकाचा एक मसुदाही सादर केला जाईल. किसान संसद त्यावर चर्चा करुन मंजूर करेल. दिल्लीत काही दिवसांपूर्वी विविध राज्यातल्या शेतकरी नेत्यांची यासंदर्भात बैठक पार पडली होती. या बैठकीत महाराष्ट्रातून राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासह योगेंद्र यादव उपस्थित होते. या बैठकीतच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा निर्णय झाला मध्य प्रदेशातल्या अखिल भारतीय किसान समितीने हमीभावासाठी मंदसौरमधून मोठी पदयात्रा काढली होती. त्याच पार्श्वभूमीवर या आंदोलनाला आता व्यापक स्वरुप दिलं जाणार आहे.