हैदराबाद : आंध्र प्रदेशमधील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीला वाईट नजर लागू नये म्हणून भन्नाट कल्पना शोधून काढलीय. शेतीचं कुठल्या प्राणी-पक्षाने नुकसान करु नये म्हणून कुणी दिवस-रात्र शेतात थांबतो, कुणी गोफण वापरतो, तर कुणी बुजगावणा उभा करतं. आंध्र प्रदेशमधील एका शेतकऱ्याने मात्र अनोखी शक्कल लढवलीय.


ए. चेंचू रेड्डी या शेतकऱ्याने आपल्या शेतात सनी लिओनीचा बिकिनीतल्या फोटोचे दोन बॅनर लावले आहेत. ‘माझ्यावर जळू नका’, असे या बॅनरवर लिहिले आहे. हा शेतकरी आंध्रच्या नेल्लोर जिल्ह्यातील बांदाकिंदिपल्ली गावातील आहे.



“खूप वर्षांपासून मला शेतीतून नुकसान सोसावा लागतो आहे. अनेक अडचणींना सामोरं गेलो. मात्र काहीच फायदा झाला नाही.”, असे सांगत शेतकरी ए. चेंचू रेड्डी पुढे म्हणाले, “सनी लिओनी लोकांना आवडते. त्यामुळे लोक माझ्या शेताकडे न पाहता, सनी लिओनीला पाहतील. त्यामुळे माझं शेत वाईट नजरेपासून वाचतील. त्यात यावेळी पीकही चांगले आहे.”

रेड्डी यांनी त्यांच्या एका मित्राच्या सांगण्यावरुन शेतात सनी लिओनीच्या फोटोचं बॅनर लावले आहे. आता जो कुणी शेताकडून जातो, तो सनी लिओनीलाच पाहतो, असेही रेड्डींनी सांगितले. दरम्यान, आता या परिसरात रेड्डींच्या या अनोख्या कल्पनेचीच चर्चा सुरु आहे.