पणजी : अल्पसंख्यांकांच्या पायाशी लोळण घेऊन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्यातील मराठी आणि कोकणी भाषिकांचा विश्वासघात केल्याचा आरोप गोव्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी केला आहे. पणजीमध्ये एबीपी माझाला दिलेल्या सडेतोड मुलाखतीमध्ये वेलिंगकर यांनी आपली खदखद व्यक्त केली.

 

स्थापनेपासूनच्या 90 वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बंडाचं निशाण का फडकलं? वेलिंगकरांनी कोणत्या कारणांमुळे राजीनामा दिला? याची सविस्तर कारणं वेलिंगकर यांच्याकडूनच जाणून घेतली.

 

काँग्रेसच्या काळात गोव्यातून स्थानिक भाषा हद्दपार करुन शाळा इंग्रजीधार्जिण्या करण्याचा डाव होता. त्यावेळी विरोधात असलेल्या पर्रिकरांनी सत्तेत येताच हा निर्णय रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण सत्तेत पर्रिकरांनी आपला शब्द पाळला नाही, असाही आरोप वेलिंगकरांनी केला.

 

दरम्यान पर्रिकरांविरोधात भूमिका घेतल्यानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या चळवळीचा चेहरा मारण्याचं काम केल्याचा गंभीर आरोपही सुभाष वेलिंगकर यांनी केला. स्थानिक भाषांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरु ठेवण्याचा इरादाही वेलिंगकर यांनी व्यक्त केला. तसंच महाराष्ट्र गोमांतकीय पक्षाशीही चर्चा सुरु असल्याचाही दावा त्यांनी केला.

 

संघाने केलेल्या कारवाईमुळे दुःखी झाल्याची भावना व्यक्त करत कुठल्याही पदाचा लोभी नसल्याचं वेलिंगकर यांनी नमूद केलं. राजकीय पक्ष काढणार आहे असं नाही, मात्र भारतीय भाषा सुरक्षा समितीच्या मुद्द्यांना पाठिंबा देणाऱ्यांना समर्थन देऊ. माझी लढाई सिद्धांतांसाठी आहे आणि ती कायम राहील, असंही वेलिंगकर म्हणाले.

 

पाहा सुभाष वेलिंगकर यांची संपूर्ण मुलाखत