नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमात व्हीआयपी संस्कृतीवरुन भूमिका मांडली. सध्या देशात देशात व्हीआयपी संस्कृतीविरोधात जनक्षोभ आहे. त्यामुळे व्हीआयपी संस्कृतीपेक्षा ईपीआय (Every Person Is Important) संस्कृती अस्तित्वात असणं गरजेचं आहे, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं


पंतप्रधान म्हणाले की, ''देशातील जनतेच्या मनात लाल दिव्याबद्दल प्रचंड राग आहे. लाल दिव्याच्या संस्कृतीमुळे तो वापरणाऱ्या नेत्यांमध्ये एकप्रकारची मानसिकता तयार झाली आहे. पण 1 मेपासून कुणाच्याही मनात हा लाल दिवा घर करुन राहणार नाही. सर्वसामान्य व्यक्तीही याचा तिरस्कार करतो. त्यामुळे यावर निर्णय घेऊन ते हटवणं ही एक प्रक्रिया होती. पण व्हीआयपी संस्कृतीची मानसिकता झटकून त्या जागी ईपीआय संस्कृती वाढीस लागणे गरजेचं आहे.''

देशातील व्हीआयपी संस्कृती मोडीत काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने लाल दिवा वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर 1 मेपासून देशात कोणतील कोणताही मंत्री लाल किंवा निळ्या दिव्याचा वापर करु शकणार नाही.

तसेच उद्या 1 मे रोजी गुजरात आणि महाराष्ट्राच्या वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त या दोन्ही राज्यातील जनतेला पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. तसेच या दोन्ही राज्यातील महापुरुषांबद्दल गौरवोद्गार काढले.

वाढत्या तापमानावरही पंतप्रधानांनी यावेळी चिंता व्यक्त केली. यंदा मार्च आणि एप्रिलमध्येच तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे.  तापमान वाढीचा फटका पशु-पक्षांनाही बसत आहे. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

याशिवाय विद्यार्थ्यांना सुट्ट्या सुरु झाल्याने भीम अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पैसे कमवण्याची संधी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच सुट्टीनिमित्त पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्यांनी #incredibleIndia यावर आपले विविध स्थळांना भेटी दिलेले फोटो शेअर करावेत असंही यावेळी सांगितलं.