बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील हंचिनाळ गावात लागलेल्या भीषण आगीत 50 हून अधिक घरे, 100 हून अधिक गवत गंज्या बेचिराख झाल्या, तर 15 हून अधिक जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अनेक दुचाकी वाहनेही आगीत भस्मसात झाली.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गावच्या शिवारात पालापाचोळा जाळण्यासाठी लावलेली आग सगळीकडे पसरली. बघता बघता गावातील घरांनी आणि गवताच्या गंज्यानी पेट घेतला आणि पन्नासहून अधिक संसार रस्त्यावर आले. गवताच्या गंज्यानी पेट घेतल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले.
आगीचे रौद्ररूप पाहून लोकांनी आपले भरले घर आगीच्या भक्षस्थानी सोडून जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळ काढला. आयुष्यभर राबून कमावलेले सारे आगीच्या भक्षस्थानी पडताना लोकांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले.
अनेक ठिकाणाहून आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या, पण सहा तासांहून अधिक काळ आग धुमसत होती.