नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) ची वेबसाईट हॅक होऊन 2.7 कोटी कर्मचाऱ्यांचा डेटा लीक झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ईपीएफओने मात्र आपलं संकेतस्थळ काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडल्याचं सांगत डेटा लीक झाल्याची शक्यता फेटाळली आहे.
'कर्मचाऱ्यांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. तुमचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे' अशी माहिती ईपीएफओ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. ईपीएफओच्या वेबसाईटमध्ये 22 मार्चलाच एक त्रुटी निदर्शनास आली होती, त्यानंतर संबंधित सेवा तात्काळ निलंबित करण्यात आली, असं स्पष्टीकरण ईपीएफओकडून देण्यात आलं आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाअंतर्गत येत असलेली aadhaar.epfoservices.com ही वेबसाईट हॅक झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर ईपीएफओकडून ही माहिती देण्यात आली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडूनही सर्व्हरमधील डेटा लीक झाल्याच्या वृत्ताला नकार देण्यात आला आहे.