नवी दिल्ली : सरकारने नोकरदारांना एक झटका दिला आहे. भविष्य निर्वाह निधीचा दर घटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पूर्वीच्या 8 पुर्णांक 65 टक्क्यांवरुन हे दर 8 पुर्णांक 55 टक्के आणण्यात आले आहेत.


सरकारच्या या निर्णयामुळे नोकरदारांच्या खिशात कमी पैसा येणार आहे. केंद्रीय कामगारमंत्री बंडारु दत्तात्रय यांनी यापूर्वीचं भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर आज ईपीएफओच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.


या निर्णयामुळे तुमच्या पगारातून कपात होणाऱ्या पीएफवर कमी व्याजदर मिळणार आहे.

सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पीएफवरील व्याजदरात कपात करण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2016-17 मध्ये 8.65 व्याजदराची घोषणा केली होती. तर 2015-16 मध्ये व्याजदर 8.8 टक्के होता. पण 2017-18 साठी 8.55 टक्के व्याजदर असणार आहेत.

दरम्यान, चालू आर्थिक वर्षात 8.65 टक्के व्याजदर कायम राखण्यासाठी EPFO ने एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF)मधील गुंतवणुकीचा आपला हिस्सा या महिन्यात 2,889 कोटी रुपयांना विकला. ज्यामुळे पीएफ खात्यांचे व्याजदर 8.65 टक्के राहण्याची अपेक्षा होती. पण या अपेक्षेवर पूर्णपणे पाणी फेरले गेले.

दुसरीकडे गेल्या काही दिवसात सरकारने लहान-लहान बचत योजनांवरील व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे सेव्हिंग स्किममध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं राहिलेलं नाही.