नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओचे सदस्य आता एक महिन्यापर्यंत बेरोजगार असल्यास खात्यातून 75 टक्के रक्कम काढू शकतात. याशिवाय त्यांना आपलं खातंही कायम ठेवता येईल.


केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी ईपीएफओच्या विश्वस्तांची बैठक झाल्यानंतर ही माहिती दिली. गंगवार ईपीएफओच्या विश्वस्तांच्या केंद्रीय बोर्डाचे चेअरमनही आहेत.

या योजनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत सलग एक महिन्यापर्यंत बेरोजगार असल्यास ईपीएफओचा कोणताही सदस्य 75 टक्क्यांपर्यंत रक्कम खात्यातून काढू शकतो आणि खातं कायम चालू ठेवू शकतो, अशी माहिती संतोष गंगवार यांनी दिली.

ईपीएफओ योजना 1952 च्या तरतुदीनुसार दोन महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिल्यास ईपीएफओ सदस्य आपली उर्वरित 25 टक्के रक्कम काढून खातंही बंद करु शकतो.

ईटीएफ म्हणजेच एक्स्चेंज ट्रेडेट फंडमध्ये ईपीएफओची गुंतवणूक 47 हजार 431.24 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. लवकरच हा आकडा एक लाख कोटींच्या पुढे जाईल. या गुंतवणुकीवर 16.07 टक्के परतावा मिळत आहे, अशी माहिती संतोष गंगवार यांनी दिली.