England vs India 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिजवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ पावसामुळे पाण्यात गेला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही सामना सुरू होऊ शकला नाही. शेवटी सामना ड्रॉ करण्यात आला.


खरं तर, ट्रेंट ब्रिजवर सततच्या पावसामुळे, पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाचे पहिले आणि दुसरे सत्र पावसामध्ये वाहून गेले आणि टी ब्रेकची घोषणा करण्यात आली. मात्र, शेवटच्या दिवसाचा खेळ सुमारे साडेपाच तासांच्या प्रतीक्षेनंतर रद्द करण्यात आला. त्यामुळे सामन्याचा निकाल निश्चित होऊ शकला नाही.


या सामन्यात भारताची पकड होती, पण पावसाने खेळ बिघडवला आणि भारताच्या विजयाच्या संधी हिरावून नेली. अशा परिस्थितीत पाऊस भारतीय संघासाठी खलनायक ठरला.




तत्पूर्वी, इंग्लंडचा दुसरा डाव शनिवारी 303 धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य मिळाले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताच्या एका बाद 52 धावा होत्या आणि नऊ विकेट शिल्लक असताना विजयासाठी 157 धावांची गरज होती.


भारताच्या दुसऱ्या डावात केएल राहुल 38 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 26 धावांवर बाद झाला, तर रोहित शर्मा 34 चेंडूत 12 धावा आणि चेतेश्वर पुजारा 13 चेंडूत 12 धावांवर तीन चौकारांच्या मदतीने नाबाद राहिला. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडला एक विकेट मिळाली.


इंग्लंडचा कर्णधार जो रूटने या कसोटीच्या पहिल्या डावात 64 धावा आणि दुसऱ्या डावात 109 धावा केल्या. त्याची कामगिरी पाहून त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना 12 ऑगस्टपासून खेळला जाणार आहे.


संघात बदल होणार नाही


इंग्लंडविरुद्ध पावसामुळे प्रभावित झालेली पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, हा संघ आमच्यासाठी 'आदर्श संघ' असेल. याचा अर्थ भारत चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू यांच्यासोबत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकतो. अशा स्थितीत, उर्वरित चार सामन्यांमध्ये रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यापैकी एकालाच खेळण्याची संधी मिळेल. पहिल्या कसोटीत जडेजाला अश्विनपेक्षा प्राधान्य देण्यात आले.