दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे (ED) पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. दिल्लीचे मद्यविक्री धोरण लागू करताना आर्थिक गैरव्यवहार (Delhi Liquor Scam Case) केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच आरोपांप्रकरणी केजरीवाल यांना ईडीने याआधी अनेकवेळा समन्स जारी केलेले आहे. मात्र यावेळी ईडीचे पथक थेट केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडकले आहे. त्यामुळे केजरीवाल यांना अटक होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.






 





अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा धक्का!


दिल्ली मद्यविक्री धोरण घोटाळा प्रकरणी अटकेपासून सुरक्षा मिळावी यासाठी केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून अंतरिम सुरक्षा देण्यास आज (21 मार्च) नकार दिला. यासह न्यायालयाने ईडीला केजरीवाल यांनी दाखल केलेल्या नव्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच या प्रकरणावर पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होईल असे सांगितले. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे केजरीवाल यांच्यासाठी चांगलाच धक्का असल्याचे मानले जात आहे. याच निकालानंतर आता ईडीचे पथक थेट केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडकले आहे.


केजरीवाल यांना अटक होणार?


सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धूम आहे. सर्वच पक्ष आपल्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतले आहेत. आप पक्षदेखील पंजाब, दिल्ली यासारख्या राज्यांत निवडणूक लढवत आहे. अरविंद केजरीवाल याच निवडणुकीचे नियोजन करण्यात व्यस्त आहेत. असे असताना ईडीचे पथक त्यांच्या निवासस्थानी जाऊन धडकले आहे. ईडीचे हे पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी का पोहोचले आहे, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र एकीकडे न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर ईडीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे केजरीवाल यांना अटक केली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.


दिल्ली मद्य धोरण काय आहे? 


मद्य विक्री धोरणातील माफियाराज, भ्रष्टाचार संपावा हा विचार समोर ठेवून केजरीवाल सरकारने दिल्लीत मार्च २०२१ मध्ये नवे मद्य विक्री धोरण लागू केले होते. यालाच उत्पादन शुल्क धोरण 2021-2022 असे नाव देण्यात आले. या धोरणांतर्गत दिल्ली सरकार मद्यविक्री  व्यवसायातून बाहेर पडले आणि मद्याची सर्व दुकानं खासगी लोकांच्या व्यक्तींच्या हातात गेली. याच मद्यविक्री धोरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा भाजपाने केला होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली. याच प्रकरणी आपचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. याच प्रकरणात सध्या अरविंद केजरीवाल यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. 


हेही वाचा 


Arvind Kejriwal : केजरीवाल झुकत नाहीत आणि ईडीही थकत नाही; मद्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीचे पाचव्यांदा समन्स


मोठी बातमी: भाजपकडून लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर, फक्त 9 जणांचा समावेश