जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये रात्री उशिरा दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. तर चकमकीदरम्यान जखमी झालेला एक जवानही शहीद झाला आहे. सुरक्षायंत्रणांकडून परिसरात अजूनही शोधमोहीम सुरु आहे.


पुलवामाच्या दलीपुरा परिसरात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षयंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आणि लष्कराने संयुक्तरित्या याठिकाणी शोधमोहीम सुरु केली. शोधमोहीम सुरु असाताना दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं. दोन्ही बाजूंनी जोरदार सुरु झालेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षायंत्रणांना यश आलं.





चकमकीदरम्यान एक जवान आणि एक नागरिक जखमी झाले होते. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान जखमी जवानाने अखेरचा श्वास घेतला. इतर जखमींवर उपचार सुरु आहेत. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सुविधाही बंद करण्यात आली आहे.


जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये 12 मे रोजी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले होते. खात्मा केलेल्या दहशतवाद्यांमध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश होता. त्याआधी 10 मे रोजी सुरक्षा यंत्रणांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं होतं.