नवी दिल्ली: केंद्र सरकारनं नोकरदार वर्गासाठी एका आनंदाची बातमी दिली आहे. यापुढे निवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना पीएफ मिळणार आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटने (ईपीएफओ) सेवानिवृत्तीच्या दिवशीच पीएफ देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रश्नोत्तराच्या तासाला संसदेत यासंदर्भात चर्चा करण्यात आली असता केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली.


तुम्ही नोकरी करत असल्यास कंपनी तुमच्या पगारातील काही रक्कम ईपीएफ खात्यामध्ये टाकते. हे पैसे केंद्र सरकार स्वतःच्या फंडात जमा करतं आणि आवश्यकता असते त्यावेळी व्याजासकट परत मिळतात. मात्र, आता ही रक्कम निवृत्तीच्या दिवशीच मिळणार आहे. तसेच 1995च्या सदस्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच आणि पेन्शनचाही भरणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या निर्णयाचा देशातल्या तब्बल ४ लाख कोटी नोकरदारांना लाभ होणार आहे.

ईपीएफओचे कंपन्यांना नेमके आदेश काय?

- खासगी कंपन्यांमधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी 3 महिन्यांआधी तयार करावी

- सर्वांना निवृत्तीच्या दिवशी अथवा जमल्यास त्यापूर्वी पीएफची सारी रक्कम द्यावी

- कंपनीच्या संचालकांनी प्रॉव्हिडंड फंडात कंपनीच्या वाट्याची पूर्ण वर्गणी महिनाभर आधीच जमा करावी

- पीएफ आणि पेन्शनचे क्लेम फॉर्मही प्रत्येक कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या महिनाभर आधीच मिळाले पाहिजे.