काश्मीर : मराठी अधिकाऱ्याच्या पुढाकाराने काश्मीर सीमेवरच्या गावात पहिल्यांदाच वीज पोहोचली आहे. काश्मीर सीमेवरचं गनौरी टांटा गाव स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच विजेच्या प्रकाशात उजळून निघाले आहे. ही किमया करण्यात सागर डोईफोडे या मराठी अधिकाऱ्याचे महत्त्वाचे योगदान आहे.


सागर डोईफोडे हे काश्मीरच्या डोडामध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डिसेंबर महिन्यात प्रशासनाच्या एका आढावा बैठकीत या गावात वीज पोहोचली नसल्याचे लक्षात आलं. त्यानंतर याबाबत काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ही समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश दिले होते. संपूर्ण टीमला एका महिन्यांचे लक्ष्य देण्यात आलं होतं. पण सागर डोईफोडे आणि त्यांच्या टीमने हे काम अवघ्या पंधरा दिवसात पूर्ण केलं.



काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. अशा बिकट परिस्थितीतही वायरिंगचं सगळं काम टीमने पूर्ण केलं.आज जिल्हाधिकारी सागर डोईफोडे यांच्या उपस्थितीत जेव्हा पहिला बल्ब पेटला तेव्हा गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. गनौरी टांटा हे काश्मीरच्या अगदी सीमेला असलेले गाव आहे. साधारण दोन हजार लोकसंख्येचं हे गाव भौगोलिक स्थितीमुळे इतकी वर्ष विजेपासून वंचित होतं.