नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विविध वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीवरुन निवडणूक आयोगानं कारवाईचा इशारा दिला आहे. राहुल गांधी यांची मुलाखत दाखवण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.


राहुल गांधी यांनी दिलेल्या मुलाखती हा आचारसंहितेचा भंग असून ही मुलाखत दाखवणाऱ्या वाहिन्यांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधींना 18 डिसेंबरच्या पाच वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या प्रकरणी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेसवर कारवाईची मागणी केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उत्तर देताना लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींनी दिलेल्या मुलाखतीची आठवण करुन दिली. ट्वीट्सच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केला.

जर काँग्रेस अध्यक्षांची मुलाखत दाखवल्याप्रकरणी वेगवेगळ्या वाहिन्यांविरोधात एफआयआर दाखल होणार असेल, तर त्याच धर्तीवर पंतप्रधान, अर्थमंत्री, केंद्रीय मंत्री आणि भाजप अध्यक्ष यांच्याविरोधात तक्रार का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

'8 डिसेंबरला (मतदानाचा पहिला टप्पा) अर्थमंत्री आणि भाजप नेत्यांनी अहमदाबादेत पत्रकार परिषद घेऊन वचननामा जाहीर केला- एफआयआर नाही. 9 डिसेंबरला मोदीजींनी 4 जाहीर सभा घेतल्या - एफआयआर नाही. अमित शाह यांनी आज अहमदाबादेत पत्रकार परिषद घेतली - एफआयआर नाही. पियुष गोयल यांनीही दोन पत्रकार परिषद घेतल्या - एफआयआर नाही. राहुलजींनी मुलाखत दिली- एफआयआर. जय हो!' अशी टीका सुरजेवाला यांनी ट्विटरवर केली.

https://twitter.com/rssurjewala/status/940950038674415616