मुंबई : गुप्तचर खात्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदचा राईट हँड छोटा शकील यानं दाऊद इब्राहीमची साथ सोडली आहे. 30 वर्षांच्या साथसोबतीनंतर दोघांमध्ये दुरावा आल्याचं वृत्त आहे.

गेल्या काही वर्षांपासून शकील हाच दाऊदच्या कारभारातला वजीर होता. पण कालांतराने हा कारभार दाऊदचा छोटा भाऊ अनिस इब्राहिमच्या हातामध्ये आला. अनेक मोठ्या निर्णयांमध्ये शकीलचं मत विचारात घेतलं जात नव्हतं आणि हेच शकीलला खटकलं.

या मुद्द्यावरुन शकीलचा दोन वेळा दाऊदशी वादही झाला आणि त्यामुळेच गेल्या 30 वर्षांपासून दाऊदशी इमान राखणाऱ्या शकीलनं त्याला निरोप दिला आहे.

मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये शकीलनं मोठी भूमिका बजावली होती. दाऊदला पळून जाण्यासाठीही शकीलने मोठी मदत केली होती. मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊदच्या साम्राज्यात शकीलचा मोठा वाटा होता.

आता दाऊदच्या साम्राज्याला खिंडार पडल्याने भारत आणि पाकिस्तानातल्या सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. कारण आतापर्यंत फक्त डी गँग कार्यरत होती, पण शकीलच्या या निर्णयामुळे त्याचीही स्वतंत्र गँग निर्माण होऊन संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या 25 वर्षांपासून भारत आपल्या सर्वात मोठ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यात यश येत नाही. पण आता दाऊदच्या साम्राज्याला खिंडार पडल्याच्या निमित्ताचा फायदा उठवायला हवा.