नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना निवडणूक आयोगाकडून (Election Commission) नोटीस बजावण्यात आलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पनौती म्हणून राहुल गांधींनी उल्लेख केला होता. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान राहुल गांधी यांना 25 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच पुढील दोन दिवसांत या नोटीशीला उत्तर द्यावं लागणार आहे.
राजस्थानमधील एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं. तसेच भाजपकडूनही राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्यात येत होतं. आता निवडणूक आयोगाकडूनही कारवाईची भूमिका घेण्यात आलीये. यावर राहुल गांधी काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
राहुल गांधींना नेमकं काय म्हटलं होतं?
पंतप्रधान मोदी म्हणजे पनौती मोदी आहेत, भारतीय टीम चांगलं खेळत होती, पण हे पनौती तिकडे गेले आणि आपल्या टीमला हरवलं अशी जळजळीत टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली होती. ते राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत होते. कत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला सहा विकेट्सने हरवलं. पूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करूनसुद्धा अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेला सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित होते. त्यानंतर आता त्यांच्यावर राहुल गांधी यांनी टीका केली.
राहुल गांधी म्हणाले की, पीएम मोदी म्हणजे पनौती मोदी, ते सामना पाहायला गेले आणि भारतीय संघ हरला. आपला संघ चांगली कामगिरी करत होता, पण पनौती तिकडे गेले आणि भारतीय संघाला हरवलं. राहुल गांधींच्या या टीकेला भाजपकडून देखील उत्तर देण्यात आलं होतं. तसेच आता निवडणूक आयोगाच्या नोटीशीवर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.