नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीशी संबंधित असलेल्या तीन अधिकाऱ्यांच्या घरावर शुक्रवारी छापेमारी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई विदेशात जमवलेल्या संपत्तीच्या चौकशी संबंधित होती. त्याचबरोबर सुरक्षा सामग्रीच्या खरेदीत काही संशयिताना दलाली मिळाल्याच्या चौकशीबाबत ही झडती घेतली गेली.
वाड्रा यांच्या कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या दिल्ली, नोएडा, सुखदेव विहार आणि जयपूर या परिसरात ही छापेमारी करण्यात आली आहे. कोणत्याही सर्च वॉरंटशिवाय ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. कायदा आणि घटनेचा अवमान करत ईडीने वाड्रा यांच्यावर ही कारवाई केली असल्याच्या आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी केला आहे.
अधिकाऱ्यांनी कोणालाही आत येऊ दिले नाही किंवा बाहेरही जाऊ दिले नाही. त्याचबरोबर मलाही त्यांनी आत जाण्यापासून रोखले असे वकील सुमन खेतान यांनी सांगितले.
स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी येथील कार्यालयात इडीने सकाळी 11 च्या सुमारास छापेमारी केली. दरम्यान आमच्या लोकांना या अधिकाऱ्यांनी आतमध्येच कोंडून ठेवले होते. त्यांनी कुणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी दिली नाही. ईडीचे अधिकारी कारवाईसाठी कार्यालयाचे कुलूप तोडून आत घुसले असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.
हे सुडाचे राजकारण असून खूप खालच्या स्तराला जाऊन पोहचले आहे, असे वाड्रा यांचे वकील म्हणाले. मागील पाच वर्षात सत्तेत असलेल्या सरकारने वाड्रा यांच्यावर फसवणुकीचे आरोप लावण्याच्या प्रत्येक पद्धतीचा वापर केला आहे. ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या सर्व एजन्सीद्वारे रॉबर्ट वाड्रा यांच्या कुटुंबातील सदस्यांना नुकसान पोहचविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे, असे वकील खेतान यांनी सांगितले आहे.