नवी दिल्ली : एअरसेल मॅक्सिस प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यासह नऊ जणांविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात पी. चिदंबरम यांना 'आरोपी क्रमांक एक' बनवण्यात आले आहे.


एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी दाखल केलेल्या या पुरवणी आरोपपत्रावर विचार करण्यास पटियाला हाऊस कोर्टाने 26 ऑक्टोबर 2018 ही तारीख निश्चित केली आहे. याच प्रकरणात सीबीआयने पूर्णपणे स्वतंत्र आरोपपत्रही दाखल केले आहे.


याआधी जुलै 2018 मध्ये दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टात एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रातही माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे नाव आरोपी म्हणून होते. या प्रकरणी पी. चिदंबरम यांचा मुलगा कीर्ती चिदंबरम आधीपासूनच आरोपी आहे.

दरम्यान, 3,500 कोटी रुपयांचा एअरसेल-मॅक्सिस व्यवहार आणि 305 कोटी रुपयांच्या आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांच्या भूमिकेची चौकशी तपास यंत्रणा करत होत्या. याच प्रकरणात माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन, त्यांचे भाऊ कलानिधी मारन आणि इतर जणांवरही तपास यंत्रणांनी आरोप केला होता की, मार्च 2006 साली मॉरिशसच्या ग्लोबल कम्युनिकेशन सर्व्हिसेस होल्डिंग लिमिटेडला एफआयपीबीची पी. चिदंबरम यांनी मंजुरी दिली होती.