नवी दिल्ली : देशात पंजाब, छत्तीसगढ, राजस्थान अशा मोजक्या राज्यांमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. पण या तीनही राज्यांमध्ये अंतर्गत संघर्षातच काँग्रेस बेजार होताना दिसतेय. सध्या दिल्लीत एकाचवेळी पंजाब आणि छत्तीसगढमधल्या अंतर्गत संघर्षानं काँग्रेस मुख्यालयाचं वातावरण तापलेलं आहे.
मला निर्णय करण्याचं स्वातंत्र्य द्या, नाहीतर पक्षाचं वाटोळं होईल..नवज्योतसिंह सिद्धू यांनी आपल्याच पक्षाला हा इशारा दिलाय.तर दुसरीकडे पंजाब काँग्रेसचे मनीष तिवारी विचारतायत सिद्धु यांनी केलं की सगळं माफ कसं, आणि आम्ही जरा आवाज केल्यावर आमची कारवाई का..
पंजाबमध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर सिद्धु शांत होतील, कॅप्टन आणि त्यांच्यातला वाद संपुष्टात येईल असं वाटलं होतं..पण हा वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीय..आता नवं नाटय घडलंय सिद्धु यांच्या सल्लागाराला हटवण्याची कारवाई पक्षानं केल्यानं.
मलविंदर माली यांना सिद्धु यांनी सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं. पण या मालींनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि काश्मीरबद्दल एक वादग्रस्त विधान केलं. हीच संधी साधत कॅप्टन ग्रुप सिद्धुंविरोधात आक्रमक झाला. आणि त्यांनी दिल्लीतून दबाव टाकत त्यांना हटवण्याची कारवाई घडवून आणली. त्यामुळे सिद्धु चांगलेच संतापले आणि त्यांनी पक्षाला हा इशारा देऊन टाकला..
काल पुन्हा पंजाबचे प्रभारी हरीष रावत दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेत होते..कॅप्टन अमरिंदर यांचे काही समर्थक दिल्लीत पोहचले...पुढच्या वर्षी पंजाबच्या निवडणुका होतायत..पण अवघे काही महिने उरले असतानाही हा वाद काही थांबायला तयार नाहीय. एकीकडे सिद्धु यांच्या सल्लागारावर कारवाई आणि दुसरीकडे पंजाब प्रभारी हरीष रावत यांनी निवडणुका कॅप्टन अमरिंदर यांच्याच नेतृत्वातच होतील असं सांगितल्यानं सिद्धु पुन्हा अस्वस्थ झालेत.
काँग्रेससाठी जी डोकेदुखी पंजाबमधे सुरु आहे, तशीच छत्तीसगढमध्येही चाललीय...विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांचे पक्षांतर्गत विरोधक टी ए सिंह देव यांच्यात खुर्चीसाठी सामना रंगलाय...अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता, त्यामुळे आता बघेल यांना हटवून मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं यासाठी टी ए सिंह देव दबाव टाकतायत...तर दुसरीकडे बघेल अशा फॉर्म्युल्याचं रडगाणं थांबवावं असं सांगतायत.
छत्तीसगढच्या आमदारांच्याही सध्या दिल्ली वा-या जोरात सुरु आहेत. भूपेश बघेल हे ओबीसी चेहरा आहेत. भाजप ओबीसी राजकारणावर भर देत आहे, त्यामुळे ओबीसी नेता दूर करणं काँग्रेसला अवघड आहे. त्यात त्यांनी राहुल गांधींना आपल्या सरकारचं काम पाहण्यासाठी पुढच्या आठवड्यात छत्तीसगढमध्ये आमंत्रित केलंय. त्यामुळे याही वादावर कसा तोडगा निघतो हे पाहावं लागेल.
देशात इन मीन तीन चार राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. पंजाब आणि छत्तीसगढमध्ये विरोधक फारसे आक्रमक नाहीयत. पण तरीही काँग्रेसच्या अंतर्गत बंडखोरीनंच इथलं सत्तासमीकरण धोक्यात आणलंय. त्यामुळे जे उरलेले बुरुज आहेत तेही काँग्रेसला सांभाळता येत नाहीयत का हा सवाल आहे.