अहमदाबाद : गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एका ठिकाणी ब्ल्यूटूथद्वारे ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप करण्यात आला. हा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. पोरबंदर येथे ब्ल्यूटूथच्या माध्यमातून ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप काँग्रेस नेते अर्जुन मोढवाढिया यांनी केला होता.


काँग्रेसच्या या आरोपानंतर निवडणूक आयोगाने इंजिनीअरकडून पडताळणी करुन घेतली. मात्र या पडताळणीत काहीही सिद्ध झालं नाही, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं.

माबाईलवर मिळत असलेल्या सिग्नलच्या आधारावर अर्जुन मोढवाढिया यांनी हा आरोप केला. बूथवर ब्ल्यूटूथ चालू केल्यानंतर तिथे ईको 105 या नावाचं डिव्हाईस दिसलं, असा आरोप अर्जुन मोढवाढिया यांनी केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान एबीपी न्यूजनेही या आरोपाची पडताळणी केली. एबीपी न्यूजची टीम यासाठी बूथवर गेली. तिथे जाऊन मोबाईलचा ब्ल्यूटूथ चालू केला. मात्र तरीही कोणतंही डिव्हाईस दिसलं नाही.

गुजरात विधानसभेच्या पहिल्या 89 जागांसाठी आत मतदार पार पडलं. सायंकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपली तोपर्यंत 68 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

याच 19 जिल्ह्यांमध्ये 2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 70 टक्के मतदान झालं होतं. पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान झालं. 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. 2012 साली या 19 जिल्ह्यांमध्ये 70 टक्के मतदान झालं होतं. सर्व पक्षांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे.