अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी मतदान पार पडलं. भाजपने गुजरातमध्ये मोठा विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन गुजरातच्या जनतेचे आभारही मानले.


''आतापर्यंत हाती आलेली माहिती उत्साह वाढवणारी आहे. भाजपच्या आकलनानुसार मोठा विजय मिळेल. पुन्हा एकदा पुढील पाच वर्षांसाठी जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल. काही ठिकाणी ईव्हीएमच्या तक्रारी आल्या, मात्र त्या किरकोळ घटना होत्या, असंही जेटली म्हणाले.

गुजरात विधानसभेच्या पहिल्या 89 जागांसाठी आत मतदार पार पडलं. दुपारी चार वाजेपर्यंत 47 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान झालं. 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत.

सलग 22 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान मोदींसाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर लवकरच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या राहुल गांधींसाठीही गुजरातची लढाई ही सोपी नाही.