Earth Hour Day 2021: आज रात्री जगभरातील लोक अर्थ अवर (Earth Hour) साजरा करणार आहेत. पृथ्वीच्या संरक्षणासाठी आणि पर्यावरण सुधारणेसाठी मार्चचा शेवटचा शनिवार दरवर्षी अर्थ अवर म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी लाईट बंद करतात. पृथ्वीवरील पर्यावरण अधिक चांगले करण्यासाठी आपला एकतेचा संदेश या माध्यमातून दिला जातो.


पर्यावरण संबधीत समस्यांविषयी लोकांना जागरूक करणे आणि त्याच्या सुरक्षिततेत हातभार लावण्यासाठी त्यांना पुढे आणणे हे यामागचं उद्दीष्ट आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे महत्त्व कोरोना साथीच्या निमित्ताने आणखी वाढले आहे. 31 मार्च 2007 रोजी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात प्रथमच अर्थ अवरचं आयोजन करण्यात आलं होतं. हळूहळू हा दिवस जगभर साजरा होऊ लागला आहे.


WWF कडून 2007 साली सुरुवात


वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) ने 2007 मध्ये अर्थ अवर डे सुरू केला. अर्थ अवर फाउंडेशनचे सह-संस्थापक अँडी रिडले यांनी WWF च्या सहकार्याने ही मोहीम सुरू केली. 2008 मध्ये अर्थ अवर डेमध्ये 35 देशांनी सहभाग घेतला होता. यावर्षी, 178 देशांमध्ये अनावश्यक वीज रात्री 8.30 ते 9.30 पर्यंत बंद  केली जाणार आहे. अर्थात यावेळी संपूर्ण जगात ब्लॅक आऊट होईल. बरेच लोक मेणबत्त्या पेटवून देखील अर्थ अवर साजरा करतात. पर्यावरण तज्ञांच्या मते, WWF च्या या जागतिक मोहिमेची हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर लढायला मदत करेल.


भारतात 2009  पहिल्यांदा अर्थ अवर साजरा


भारत 2009 मध्ये या मोहिमेचा भाग बनला होता. यात 58 शहरांमधील 50 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. 2010 मध्ये भारतातील 128 शहरांतील 70 लाखांहून अधिक लोकांनी या उपक्रमात भाग घेतला होता. यानंतर ही संख्या वाढतच आहे. राजधानी दिल्लीतील वीज वितरण कंपन्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांच्या ग्राहकांना जागरूक करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.


अनेक ऐतिहासिक वास्तूंची लाईटही बंद होणार


अर्थ अवर डे दरम्यान जगभरातील अनेक ऐतिहासिक इमारतींची लाईट बंद केली जाते. यामध्ये न्यूयॉर्कमधील एम्पायर वर्ल्ड बिल्डिंग, दुबईतील बुर्ज खलिफा, पॅरिसमधील आयफेल टॉवर आणि अथेन्समधील अ‍ॅक्रोपोलिस अशा 24 जगप्रसिद्ध वास्तूंचा समावेश आहे. भारतातील अर्थ अवर दरम्यान राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटसह अनेक ऐतिहासिक वास्तूंची लाईट बंद केली जाते.