Chief Justice DY Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud) यांनी पुरुष आणि महिलांच्या पगारातील तफावत आणि महिलांच्या हक्कांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महिलांना पुरुषांपेक्षा कमी पगार मिळतो असं वक्तव्य सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी केलं. बंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 


महिलांना कमी पगार मिळतो


भारतात महिला आणि पुरुष यांच्या पगारातील तफावतीवर बोलताना चंद्रचूड म्हणाले की, हा मुद्दा भारतीय महिलांसाठी विशेषतः ठळक आहे, विशेषत: उपेक्षित असलेल्या महिलांसाठी. विविध व्यावसायिक क्षेत्रात महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान असूनही, त्यांना अजूनही पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळत असल्याचे चंद्रचूड म्हणाले.


गृहिणींना घरकामाचा मोबदला मिळत नाही


सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, घर हे गृहिणीसाठी आर्थिक घडामोडींचे ठिकाण आहे. जिथे तिला तिच्या सेवेसाठी वेतन दिले जात नाही. त्याचवेळी, महिलांना सार्वजनिक ठिकाणी विशिष्ट सेवा आणि व्यवसायांसाठी मर्यादित केले जाते. अशा प्रकारे त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे चंद्रचूड म्हणाले. 


सार्वजनिक शांतता भंग करण्याचा गुन्हा


भारताचे 19 वे सरन्यायाधीश ईएस वेंकटरामय्या यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना सरन्यायाधीश म्हणाले की कायद्याचा उद्देश सार्वजनिक आणि खासगी दोन्ही ठिकाणी विस्तारित केला पाहिजे. भारतीय दंड संहितेत अशी तरतूद आहे की जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती भांडतात आणि सार्वजनिक शांतता बिघडवतात तेव्हा तो गुन्हा मानला जातो. परंतु जेव्हा हाणामारी सार्वजनिक ठिकाणी होते तेव्हाच तो दंडनीय आहे. अशा परिस्थितीत, कायद्याचा भर केवळ वादांच्या गुणवत्तेवर आणि तोटेवर नाही, तर तो कुठे होत आहे यावर आहे.


घरगुती नोकरांना कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसारखे फायदे मिळत नाहीत


समाजाने आपल्याला शिकवलेल्या कल्पनेच्या पलीकडे आपले मन मोकळे करण्यास आपण तयार आणि इच्छुक असतो. तेव्हा न्यायाची भावना विकसित होते. जेव्हा लोक त्यांच्या घरात नोकर ठेवतात, तेव्हा त्या व्यक्तीला कॉर्पोरेट कर्मचाऱ्यासारखे फायदे दिले जातात का? असा सवालही चंद्रचूड यांनी केला.