नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशला काल पुन्हा एकदा धुळीच्या वादळाचा फटका बसला. यात तब्बल 68 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
दिल्लीत काल दुपारी अचानक धुरळ्यासह वेगानं वारे वाहू लागले. पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. मात्र काही वेळातच वादळानं आक्रमक रुप धारण केलं. गुरुग्राम आणि दिल्ली-एनसीआर परिसरात अनेक ठिकाणी झाडं कोलमडली. तर 40 हून अधिक विद्युत पोल पडले.
वाऱ्याच्या वेगानं लग्नसमारंभातली मंडपही कोसळली आहेत. आता हे वादळ ईशान्य भारताच्या दिशेकडे सरकलं आहे. तसंच हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ओडीशात जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, वादळी वारे आणि पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणं काही काळ रद्द झाली. रस्त्यांवर व्हिजीब्लिटी कमी असल्यानं वाहनंही अत्यंत धीम्या गतीनं धावत होती. तर मेट्रोसेवाही बराच वेळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
दिल्लीतील वाहतूक ठप्प झाल्यानं लोकांची तारांबळ उडाली आहे. इंद्रप्रस्थ करोलबागदरम्यान मेट्रो मार्गावर झाड पडल्यानं मेट्रो सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे लोकांना पायी चालावं लागलं त्यात वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं लोकांची तारांबळ उडाली आहे.