या हुबेहुब अण्णांचं खरं नाव एस एन शाह नक्वी आहे. तेलंगणाचे अण्णा हजारे म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. अगदी हुबेहुब अण्णांसारखा पेहराव करुन ते वावरतात. अण्णांसारखाच चष्मा, तसंच धोतर, गांधी टोपी आणि चालण्याची, हातवारे करण्याची स्टाईलही तशीच.
विशेष म्हणजे हे केवळ अण्णांसारखे दिसत नाहीत, तर त्यांच्यासारखे आंदोलकही आहेत. अण्णांच्या आंदोलनात आपण फार पूर्वीपासून आहे, स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावरही आंदोलनात त्यांनी सहभाग घेतलेला होता. त्यामुळे आपण केवळ अण्णा हजारेंचे डुप्लिकेट नाही तर ‘शकल भी हैं, और अकल भी है’ असं ते अभिमानाने सांगतात.
अण्णांप्रमाणेच तेही लष्करातून निवृत्त झालेले जवान आहेत. अण्णांशी जेव्हा पहिली भेट झाली, तेव्हा मला अशा अवतारात पाहून तेही काहीसे चकित झाल्याची आठवण त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली.
अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पहिल्या दिवसापासून ते रामलीला मैदानावर दाखल झालेत. देशातल्या शेतकऱ्यानं एक दिवस असं उपोषण केलं पाहिजे, की केवळ स्वत:पुरतंच पिकवायचं, जेव्हा खायला काही मिळणार नाही तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गंभीरता देशाला कळेल असंही त्यांनी कळकळीनं बोलून दाखवलं. अण्णांचे हे डुप्लिकेट केवळ त्यांच्यासारखे दिसतच नाहीत, तर त्यांच्यासारखं भाषणही करतात.
पाहा व्हिडीओ :