नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व व्यक्तींना पोस्टल मतदानाचा अधिकार आयोगाने दिला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं निवडणूक आयोगाचे मत आहे. याआधी पोस्टल मतदानासाठी 80 ही वयोमर्यादा होती. 80 पेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना पोस्टल मतदानाचा अधिकार प्राप्त होता. पण आता कोरोना संकटामुळे ही वयोमर्यादा कमी करून 65 करण्यात आली आहे.


याशिवाय कोरोना पॉझिटिव्ह आणि होम क्वॉरंटाईन करण्यात आलेली व्यक्ती यांनाही पोस्टल मतदान करण्याचा अधिकार आयोगाने जाहीर केला आहे. या वर्षाच्या अखेरीस बिहारच्या निवडणुका अपेक्षित आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्त्वाची आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी मात्र आयोगाच्या या निर्णयाला विरोध केला होता. मतदाराची खरी ओळख पटणं हा मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी महत्त्वाचा भाग आहे. आणि एका झटक्यात इतक्या मोठ्या गटाला यातून वगळल्याने गैरव्यवहार वाढू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.

तसेच हा निर्णय घेताना आयोगाने राजकीय पक्षांची कुठलीच चर्चा न केल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. पण आज केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृत नोटिफिकेशन काढून या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे.

Neet and Jee exam | नीट आणि जेईईच्या परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता