DU Notice Rahul Gandhi : दिल्ली विद्यापीठ (DU) राहुल गांधींना (Rahul Gandhi) नोटीस बजावणार आहे. न कळवता विद्यापीठाच्या कॅम्पसला भेट दिल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव विकास गुप्ता म्हणाले की, "अशा भेटीमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात येते आणि अशा कोणत्याही संवादासाठी योग्य प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे, असं विद्यापीठकडून राहुल गांधी यांना नोटीसच्या माध्यमातून सांगण्यात येईल."
राहुल गांधींची विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबतची भेट अनधिकृत : विद्यापीठ प्रशासन
राहुल गांधी यांनी मागील आठवड्यात शुक्रवारी (5 मे) विद्यापीठाच्या पोस्ट ग्रॅज्युएशन हॉस्टेलला भेट दिली होती. इथे त्यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत जेवणही केलं होतं. मात्र ही अनधिकृत भेट असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. राहुल गांधी आत गेले तेव्हा विद्यार्थी जेवण करत होते. आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये हे सहन करु शकत नाही. कॅम्पसच्या वतीने राहुल गांधी यांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. त्यांनी पुन्हा असं कृत्य करु नये, असं नोटीसमध्ये स्पष्टपणे सांगण्यात येईल.
राहुल गांधींवरील कारवाईसाठी प्रशासनावर दबाव : NSUI
दरम्यान, राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (NSUI) केला आहे. त्याचवेळी कुलसचिव विकास गुप्ता यांनी हे आरोप फेटाळून लावत 'असा कोणताही दबाव नसल्याचं सांगितलं. ही शिस्तीची बाब असल्याचे ते म्हणाले. अशा घुसखोरीच्या घटना टाळण्यासाठी विद्यापीठाचे अधिकारी आवश्यक ती पावले उचलतील, जेणेकरुन भविष्यात असे प्रकार घडू नयेत, असे त्यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांसोबत एक तास चर्चा
राहुल गांधी शुक्रवारी अचानक दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत जेवण केलं. दुपारी 2 नंतर ते कॅम्पसमध्ये पोहोचले आणि तिथे सुमारे एक तास विद्यार्थ्यांसोबत घालवला. तसंच विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांच्या करिअरच्या योजनांची माहिती घेतली.
कर्नाटकात राहुल गांधींचा कामगारांसोबत संवाद
दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस भेटीनंतर राहुल गांधी यांनी रविवारी (7 मे) कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) इथे कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्ससह संवाद साधला होता. त्यांनी विविध कंपन्यांच्या कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्सच्या समस्या ऐकून घेतल्या. यासोबतच राहुल गांधींनी या कामगारांसोबत मसाला डोसा आणि कॉफीच्या नाश्ताचाही आनंद लुटला.
हेही वाचा