President Oath Taking Ceremony, Droupadi Murmu : आज 25 जुलै... आजचा दिवस भारतासाठी (India) अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याचं कारण म्हणजे, आजच्याच दिवशी दर पाच वर्षांनी देशाला नवा राष्ट्रपती (President) मिळतो. आजच 25 जुलै रोजी भारताच्या नवनिर्वाचित 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपले प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकानं पराभव करत मुर्मू यांनी संपादन केला आहे. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदी विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर 25 जुलैला अनेक राष्ट्रपतींनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. अशा परिस्थितीत भारताच्या इतिहासात 25 जुलै ही तारीख राष्ट्रपतींच्या शपथविधीसाठीही ओळखली जाते.
राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैलाच का?
राष्ट्रपती म्हणजे, देशाचा पहिला नागरिक. देशाच्या इतिहासात आतापर्यंत अनेक राष्ट्रपतींनी 25 जुलै रोजी शपथ घेतली आहे. देशाच्या सहाव्या राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी 25 जुलै रोजी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर ज्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ पूर्ण झाला, त्या सर्वांनी याच तारखेला पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. नीलम संजीव रेड्डी यांच्यानंतर देशातील एकूण 8 राष्ट्रपतींनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. 24 जुलै रोजी राम नाथ कोविंद यांचाही कार्यकाळही पूर्ण झाला असून आज 25 जुलै रोजी देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत.
कोणकोणत्या राष्ट्रपतींनी घेतली 25 जुलै रोजी शपथ?
इंदिया गांधी सरकारनं देशात जेव्हा आणीबाणी लागू केली होती, त्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळी राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी जनता पक्षाच्या माजी नेत्या नीलम संजीव रेड्डी यांनी विजय मिळवला होता. नीलम संजीव रेड्डी यांनी 25 जुलै, 1977 रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यानंतर दर पाच वर्षांनी 25 जुलै रोजीच देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती शपथ घेतात. आतापर्यंत ज्या राष्ट्रपतींनी 25 जुलै रोजी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली, त्यांची यादी पाहुयात...
- नीलम संजीव रेड्डी (Neelam Sanjiva Reddy) (25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982)
- ज्ञानी जैल सिंह (Giani Zail Singh) (25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987)
- रामास्वामी वेंकटरमन (Ramaswamy Venkataraman) (25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992)
- शंकरदयाल शर्मा (Shankar Dayal Sharma) (25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997)
- केआर नारायनन (K. R. Narayanan) (25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002)
- एपीजे अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam) (25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007)
- प्रतिभा पाटिल (Pratibha Patil) (25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012)
- प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) (25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017)
- रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) (25 जुलै 2017 ते 25 जुलै 2022)
दरम्यान, आतापर्यंत देशाच्या इतिहासात अद्याप राष्ट्रपती पद कधीच रिक्त नव्हतं. मावळत्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर लगेचच नवनिर्वाचित राष्ट्रपतींना पद आणि गोपनियतेची शपथ दिली जाते. दरम्यान, देशाच्या 15व्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीची मतमोजणी 21 जुलै रोजी पार पडली आणि द्रौपदी मुर्मू यांनी निवडणूक जिंकली. आज द्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा आज शपथविधी; सरन्यायाधीश देणार पद आणि गोपनीयतेची शपथ