मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती आज देशभरात साजरी होत आहे. त्यानिमित्ताने रात्रीपासूनच दादरच्या चैत्यभूमीवर भीमसैनिकांनी गर्दी केली आहे. लाखो भीमसैनिक चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत.

 

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 500 पोलिसांच्या जोडीला एसआरपीएफचं पथकं देखील तैनात करण्यात आलं आहे.

 

चैत्यभूमीवर 'भीमपहाट' कार्यक्रम



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती महोत्सवानिमित्त नरेंद्र जाधव यांनी लिहिलेल्या 'कॉफी टेबल बुक' या पुस्तकाचं प्रकाशन आज करण्यात येणार आहे. चैत्यभूमीजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. तत्पूर्वी याच ठिकाणी 'भीमपहाट' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

गिरगाव चौपाटीवर आंबेडकरांचं वाळूशिल्प



दुसरीकडे 125 व्या जयंतीनिमीत्त मुंबईत आंबेडकरांचं वाळूशिल्प गिरगावच्या चौपाटीवर साकारण्यात आलं आहे.  पद्मश्री पुरस्कार विजेते प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी हे शिल्प साकारलं आहे.

 

रोहित वेमुलाचे आई-भाऊ बौद्ध धर्म स्वीकारणार

याशिवाय आंबेडकर जयंतीला रोहित वेमुलाची आई आणि भाऊ मुंबईच्या चैत्यभूमीवर बौद्ध धर्म स्वीकारणार आहेत. हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुलाने जानेवारीमध्ये आत्महत्या केली होती.

 

चेंबूरमध्ये बाबासाहेबांची 125 फुटांची रांगोळी

तर चेंबूरमध्ये बाबासाहेबांची भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. 125 फुटांच्या रांगोळीद्वारे बाबासाहेबांना कलाकारांकडून अभिवादन करण्यात येत आहे. 400 किलो कागद आणि 700 किलोचे विविध रंग वापरुन ही रांगोळी साकारण्यात आली आहे. 125 फुटांच्या या रांगोळीमध्ये बाबासाहेबांचा चेहरा 18 फुटांचा असून हाताची लांबी 16 फूट आहे. ही रांगोळी काढण्यासाठी कलाकारांनी तब्बल 1 महिना मेहनत घेतली. या भव्य रांगोळीची नोंद गिनीज बुक आणि लिम्का बुकमध्ये करण्यात आली आहे.

 

मोदी 'ग्रामोदय से भारत उदय' कार्यक्रमाला सुरुवात करणार

बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंबेडकरांच्या मध्यप्रदेशमधील महू येथील जन्मस्थळावरुन 'ग्रामोदय से भारत उदय' या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे.

 

तसंच दिल्लीचं अरविंद केजरीवाल सरकार आज तालकटोरा स्टेडियममध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करणार आहे.