नवी दिल्ली : फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी कडक कायदा करण्याच्या विचारात सरकार आहे. ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात करणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचा दंड किंवा 2 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.
गुन्ह्याची पुनरावृत्ती झाली तर थेट 50 लाख दंड आणि 5 वर्षाचा तुरुंगावस अशी दुहेरी शिक्षा करण्याचा विचार सुरु आहे. तेलगु देसम पार्टीचे खासदार जे. सी. दिवाकर रेड्डींच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीनं कडक शिफारशी सुचवल्या आहेत.
त्या सरकारच्या विचाराधीन आहेत. मात्र त्याचं कायद्यात रुपांतरण झालं तर यापुढे कंत्राटं करताना सेलिब्रिटीजना जास्त सावध राहावं लागेल.
दरम्यान आम्रपालीच्या जाहिरातीमुळे धोनीवर टीका होत असताना शाहरुखने मात्र त्याची पाठराखण केली आहे. कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करताना सेलिब्रिटींनी त्या उत्पादनाची खात्री करून घेणं गरजेचं आहे. पण उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत सेलिब्रिटींना जबाबदार धरता येणार नाही, असा बचावात्मक पवित्राही शाहरूखनं घेतला.
काही दिवसांपूर्वीच आम्रपाली बिल्डर्सकडून ग्राहकांची फसवणूक झाल्यानं ब्रँड अॅम्बेसॅडर महेंद्रसिंग धोनीवर सोशल मीडियावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर बिल्डरशी बोलून आपण ग्राहकांना घर मिळवून देऊ असं आश्वासन धोनीनं दिलं होतं. त्यामुळे शाहरूखनं अप्रत्यक्षपणे धोनीला पाठिंबा देत, त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.