बंगळुरु: राज्यातील मतदारांना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असलेलीच आश्वासने द्या, असा सल्ला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी अलीकडेच कर्नाटकातील नेत्यांना दिला होता. त्यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी ट्विटरवरुन काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा विरोधकांच्या रेवडी पॉलिटिक्सवर टीका केली आहे. मात्र, आता काँग्रेस पक्षाला कर्नाटकमध्ये सत्तेत आल्यानंतर वास्तवाला धरुन नसलेल्या आश्वासनांची पूर्ती करणे अवघड जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. यावरुन मल्लिकार्जुन खरगे यांनीही ट्विट करुन नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिले.
खोटेपणा, लबाडी, थापेबाजी, लूट आणि जाहिरातबाजी ही पाच विशेषणे केंद्रातील एनडीए सरकारला लागू पडतात. तुम्ही ढोल बडवत असलेला 100 दिवसांचा प्लॅन हा चीप पब्लिसिटी स्टंट आहे. 16 मे रोजी तुम्ही म्हटले होते की, 2047 मधील भारताचा रोडमॅप तयार करण्यासाठी 20 लाख लोकांशी संवाद साधू, असे तुम्ही म्हटले होते. मात्र, आता सरकारने किती लोकांशी संवाद साधला याचा तपशील माहिती अधिकार कायद्यातंर्गत मागवला असता, संबंधित तपशील पंतप्रधान कार्यालयाने देण्यास नकार दिला. यावरुन तुमचा खोटेपणा उघड होतो. BJP या पक्षाच्या नावातील B हा विश्वासघात (Betrayal) आणि J चा अर्थ जुमला असा होतो. मोदींनी दिलेल्या अच्छे दिन आणि 2 कोटी रोजगाराच्या आश्वासनाचं काय झालं, असा सवालही मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
अवास्तव आश्वासनं देणं सोपे असते पण त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे अवघड होऊन बसते, याची जाणीव आता काँग्रेस पक्षाला झाली आहे. अवास्तव आश्वासनं प्रत्यक्षात आणणे हे अत्यंत कठीण आणि अशक्य असते. काँग्रेसने अनेक प्रचारसभांमधून लोकांना खोटी आश्वासने दिली. ही आश्वासने पूर्ण करणे शक्य नाही, हे काँग्रेसलाही माहिती होते. आता ते जनतेसमोर वाईट पद्धतीने उघडे पडले आहेत. काँग्रेसची सत्ता असलेले उत्तराखंड, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा, कोणतेही राज्य बघा, त्याठिकाणी विकासाचा खेळखंडोबा झाला आहे आणि राज्याची आर्थिक स्थिती वाईट झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते. यावरुन खरगे विरुद्ध मोदी या ट्विटर वॉरला सुरुवात झाली होती.
आणखी वाचा