नवी दिल्ली : देशातील काही शहरांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनंतर पुन्हा एकदा निर्बंध येऊ लागले आहेत. देशाची राजधानी दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये मास्क पुन्हा एकदा अनिवार्य करण्यात आले आहे. खरंतर कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने या शहरांमधून मास्कची अनिवार्यता रद्द करण्यात आली होती. परंतु कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोनाची चौथी लाट आली आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे ( ICMR) माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रमण आर. गंगाखेडकर यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या चर्चा फेटाळल्या आहेत. ते म्हणाले की, "ही चौथी लाट आहे असे मला वाटत नाही." "पण कोरोनाच्या BA.2 व्हेरिएंटचा जगभरातील लोकांवर परिणाम होत आहे," असंही त्यांनी नमूद केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
मास्क वापरणं अजूनही गरजेचं
डॉ. गंगाखेडकर म्हणाले की, अद्याप कोणताही नवीन व्हेरिएंट समोर आलेला नाहीत. जे वृद्ध आहेत, ज्यांनी लस घेतलेली नाही आणि ज्यांना आतापर्यंत संसर्ग झाला आहे, त्यांनी फेस मास्क वापरायलाच हवा. मास्कचा वापर ऐच्छिक केल्याने अनेकांनी गैरसमज करुन घेतला की कोरोना संसर्गाचा धोका कमी झाला आहे. 






 


शाळा बंद करण्याची गरज नाही
ते म्हणाले की, शाळा बंद करु नये, कारण यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आणि सर्वांगीण विकासाला बाधा निर्माण होईल. 12 वर्षांवरील वयोगटातील ज्या विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी, असं आवाहनही डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केलं आहे.


चौथ्या लाटेची चिन्हे नाहीत : IIT कानपूर प्राध्यापक
याआधी आयआयटी कानपूरच्या प्राध्यापक अग्रवाल म्हणाले, "वाढत्या सामाजिक उपक्रमांमुळे, मास्क न घालणे आणि खबरदारी न घेणे यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे." पण सध्या कोरोनाच्या चौथ्या लाटेची कोणतीही चिन्हे नाहीत, असंही प्राध्यापक अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.


संबंधित बातम्या