अहमदाबाद/ गुजरात : एकीकडे महागाई बेरोजगारीमुळे देशातील तरुण चिंतेत असताना, दुसरीकडे आपल्या देशातले कुत्रे मात्र कोट्यधीश बनत आहेत. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात हे खरं ठरतंय. मेहसाणा जिल्ह्यातील पंचोत गावातील एका संस्थेतील 70 कुत्रे कोट्यधीश झाले आहेत.


टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, पंचोत गावामध्ये कुत्र्याच्या देखभालीसाठी ‘मध नी पती कुतरिया’ नावाची संस्था स्थापन झाली. या संस्थेची 21 एकर जमीन आहे. या गावातून मेहसाणा बायपास रस्ता बनणार असल्याने, या परिसरातील जमिनीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

सध्या इथल्या जमिनीचा दर प्रति एकर 3.5 कोटी रुपये आहे. त्यामुळे संस्थेच्या 21 एकर जमिनीची किंमत 70 कोटीपर्यंत पोहोचली आहे. या जमिनीतून मिळणारं उत्पन्न कुत्र्यांच्या देखभालीसाठी वापरलं जातं. त्यामुळे संस्थेने सांभाळलेल्या कुत्रे प्रत्येकी एक कोटीचे मालक झाले आहेत.

संस्थेचे अध्यक्ष छगनभाई पटेल यांनी सांगितलं की, “गावाला पशू प्रेमाचा मोठा इतिहास आहे. याची सुरुवात एका गर्भश्रीमंत कुटुंबाकडून झाली. ज्या जमिनीची देखभाल करणे या कुटुंबाला शक्य नव्हते, त्यांनी जमीन दान म्हणून दिली. त्यावेळी जमिनीची इतकी किंमत नगण्य होती. पण सध्या गावातून बायपास रस्ता जाणार असल्याने जमिनीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.”

कुत्र्यांसाठी दानमध्ये मिळालेल्या जमिनीची 80 वर्षापूर्वी काही शेतकऱ्यांनी मशागत करण्यास सुरुवात केली. प्रत्येक वर्षी या जमिनीचा लिलाव केला जातो. जो लिलावात चांगली बोली लावतो, त्याला एक वर्षासाठी जमीन कसायला दिली जाते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुत्र्यांची देखभाल केली जाते.

कुत्र्यांच्या खाण्या-पिण्यासाठी संस्थेने एक छोटं घर बनवलं आहे.