लखनऊ: लोकसभा निवडणुकीसाठी जेमतेम वर्ष राहिलं आहे. त्यामुळे भाजपला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी विरोधकांनी डावपेच बांधायला सुरुवात केली आहे.


उत्तर प्रदेशात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यात येणार आहे. मोदींच्या वाराणसी मतदारसंघात दुसरं तिसरं कोणी नाही तर खुद्द सपा नेते अखिलेश यादव हेच शड्डू ठोकण्याची चिन्हं आहेत.

अखिलेश यादव मोदींविरोधात वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. समाजवादी पार्टीत सध्या त्याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र स्वत: अखिलेश यादव यांनी अद्याप याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.

अखिलेश यादव कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक लढवणार हे निश्चित मानलं जात आहे. कारण उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांसाठी अजून चार वर्ष शिल्लक आहेत. त्यामुळे अखिलेश यादव मोठा राजकीय डाव खेळण्याच्या तयारीत आहेत.

जर अखिलेश यादव लोकसभेच्या आखाड्यात उतरलेच, तर ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हा प्रश्न आहे. अखिलेश यांच्या जवळच्या मित्राच्या मते, “त्यांनी कन्नौज किंवा मैनपुरीमधून निवडणूक लढवून जिंकली, तर तो सामान्य विजय असेल. मात्र त्यांनी वाराणसीतून निवडणूक लढवून मोदींना हरवलं तर देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल”.

काही सपा नेत्यांचंही म्हणणं तेच आहे. अखिलेश यादवांनी अशा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, ज्यातून एक राजकीय संदेश पोहोचावा. त्यासाठी वाराणसीपेक्षा मोठा पर्याय कोणता नाही, असं सपा नेत्यांचं म्हणणं आहे.

असं असलं तरी अखिलेश यादव यांनी अजून आपले पत्ते उघडले नाहीत.

दुसरीकडे मुलायमसिंह यादव यांनी यावेळी आझमगढऐवजी मैनपुरीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तर रामगोपाल यादव संभळमधून निवडणूक लढवणार आहेत.

त्यामुळे अखिलेश यादव वाराणसीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

बसपाची साथ

दुसरीकडे अखिलेश यादव यांना साथ देण्याची तयारी बसपाने केली आहे. बसपाच्या राज्यसभा खासदाराने सांगितलं की जर अखिलेश यादव वाराणसीतून निवडणूक लढणार असतील, तर आम्ही मोदींना तिथेच घेरण्यात यशस्वी होऊ. मग अखिलेशजींचा निवडणुकीत विजय होवो अथवा पराभव, आम्ही मोदींना तिथेच थोपवून ठेवू.

मोदींचा मोठा विजय

दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघात मोठा विजय मिळवला होता. मोदींना 4 लाख 81 हजार मतं मिळाली होती. त्यावेळी मोदींना अरविंद केजरीवाल यांनी आव्हान दिलं होतं. केजरीवाल यांना 2 लाख 9 हजार मतं मिळाली होती.