मुंबई : महिलांनो जरा लक्ष द्या... चेहरा गोरा करण्याचा दावा करणारी फेअरनेस क्रीम्स आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना विकत घेता येणार नाहीत. राज्य सरकारने स्टेरॉईड आणि अँटीबायोटीकचा समावेश असेलेल्या फेअरनेस क्रीमच्या सरसरकट विक्रीवर बंदी घातली आहे.


जर फेअरनेस क्रीम तयार करणाऱ्या कंपन्यांनी या नियमांचं पालन केलं नाही तर कंपनीला एफडीएच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. डेसोनाईड, बेक्लोमेथासोनसह अन्य 14 घटकांचा समावेश असेलेली क्रीम्स डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय चेहऱ्याला फासणं धोकादायक आहे.

आजवर या क्रीम्सची खुलेआम, बिनधोक विक्री केली जायची. सल्ल्याशिवाय या क्रीम्सचा अति किंवा गैरवापर तुमच्या चेहऱ्याला गंभीर नुकसान पोहचवू शकतो.

या क्रीम्सच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावर बारीक पुरळ येण्याचा धोका असतो. त्यामुळे स्कीन बर्नचाही धोका उद्भवतो. त्वचेचा पोत खराब होऊन त्वचेला गंभीर दुखापतीची शक्यता असते. चेहऱ्यावर या क्रीमच्या वापरानं केस (लव) वाढ होण्याचीही भीती असते.
सरकारच्या या निर्णयाचं डॉक्टरांनी मात्र स्वागतच केलं आहे.

गोऱ्या रंगाचं आकर्षण आपल्याकडे नवं नाही. त्यापायी अनेकांनी स्वत:वर अघोरी वैद्यकीय उपचारांचे प्रयोग केल्याचीही उदाहरणं आहेत. अलिकडे हा ट्रेंड बदलतानाही दिसतो. समाजात ब्लॅक इज ब्युटिफुल ही नवी टॅगलाईन रुढ होत आहे.

माणसाचा रंग म्हणजे घराची भिंत नाही, की हवा तेव्हा रंग बदलला. पण त्याची जाणीव कमकुवत आहे. पण तरीही ज्यांना प्रयोग करायचे आहेत त्यांच्यासाठी एफडीएनं सुरक्षाकवच दिलं इतकंच.