नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच गुरुवारी एक दिवसाचं उपोषण करणार आहेत. देशाचा पंतप्रधान उपोषण करत असलेली ही इतिहासातील बहुधा पहिलीच घटना असावी.

नुकतंच काँग्रेसचं तीन तासांचं इन्स्टंट उपोषण झालं होतं, त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह उपोषण करणार आहेत.

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालवलं, याचा निषेध नोंदवण्यासाठी 12 एप्रिलला मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उपोषण करणार आहेत.

दिवसभर उपोषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसभर आपल्या कार्यालयातच उपोषण करणार आहेत. तर अमित शाह कर्नाटकातील हुबळी इथं सांकेतिक धरणं देणार आहेत. विरोधी पक्ष विकासकामात अडथळे आणत असल्याचं, मोदींनी कालच चंपारण्य इथं म्हटलं होतं.

भाजप खासदारही उपोषण करणार

एकीकडे मोदी कामकाजाच्या वेळीच आपल्या कार्यालयात उपोषण करणार आहेत, तर त्यांना पाठींबा म्हणून भाजपचे खासदारही एक दिवसाचं उपोषण करणार आहेत.

स्वत:च्या मतदारसंघात भाजप खासदार उपोषण करणार आहेत.

अधिवेशन वाया

पाच मार्चला सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र चर्चेविनाच संपलं. यासाठी विरोधक आणि सरकारने एकमेकांकडे बोट दाखवलं.

बँक घोटाळ्यावरुन काँग्रेसने पहिले पाच दिवस कामकाज होऊ दिलं नाही, तर त्यानंतर वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत, सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता.

याव्यतिरिक्त काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीएमनेही कामकाज ठप्प केलं होतं.