पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारांना प्रतिसाद देत असून यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. पर्रिकर यांच्यावर उपचार करण्यासाठी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) पथक सायंकाळी गोमेकॉत दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या उपचारांना मुख्यमंत्री प्रतिसाद देत असून त्यांची तब्येत आता स्थिर आहे. उद्या त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती विश्वजीत राणे यांनी दिली.
दिल्लीत एम्समध्ये असताना याच डॉक्टरांच्या निगराणीखाली मनोहर पर्रिकर यांच्यावर उपचार झाले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना शनिवारी दोनापावल येथील निवासस्थानातून गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. त्यांना जीआय अँडोस्कोपीसाठी दाखल केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून जाहीर करण्यात आले होते. मात्र अँडोस्कोपी झाली नसून रविवारी दिल्लीहून आलेल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर नव्याने उपचार करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार एम्सच्या गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभागाचे असोसिएट डीन (संशोधन) डॉ. प्रमोद गर्ग हे या गोव्यात आलेल्या डॉक्टरांच्या पथकाचे नेतृत्त्व करत आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी रविवारी सकाळी आणि सायंकाळी गोमेकॉत भेट देऊन आढावा घेतला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनोहर पर्रिकर यांची प्रकृती आरोग्याच्या सर्व निकषांवर समाधानकारक असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, "मी सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटलो. उद्यापर्यंत त्यांना निगराणीखाली ठेवले जाईल. मनोहर पर्रिकर अॅक्टिव्ह आणि अलर्टही आहेत, असे नमूद करुन लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये".
14 फेब्रुवारी 2018 पासून मनोहर पर्रिकर आजारी आहेत. प्रथम त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल केलं होतं. तेथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर 3 मार्च 2018 रोजी अमेरिकेला उपचारांसाठी गेले. तेथून 14 जून रोजी परतले. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी पुन्हा अमेरिकेला उपचारांसाठी गेले आणि 22 ऑगस्ट रोजी परतले. त्यानंतर महिनाभर दिल्लीतील एम्समध्ये उपचार घेऊन 15 सप्टेंबर रोजी ते परतले. अडीच महिन्यांच्या कालखंडानंतर गेल्या 2 जानेवारी रोजी ते कार्यालयात रुजू झाले. 27 जानेवारी रोजी तिसऱ्या मांडवी पुलाच्या उद्घाटन समारंभालाही उपस्थिती लावली. 31 जानेवारी रोजी पुन्हा त्यांना एम्समध्ये नेण्यात आले तिथून गेल्या 5 फेब्रुवारी रोजी ते परतले. गेल्या 9 फेब्रवारीला भाजपाच्या बूथ कार्यकर्ता संमेलनातही पक्षाध्यक्ष अमित शहा आले होते तेव्हा त्यांनी उपस्थिती लावली.
मुख्यमंत्र्यांच्या वाढत्या आजारपणाची दखल घेऊन पक्ष नेतृत्वाने बी.एल. संतोष यांना निरिक्षक म्हणून गोव्यात पाठवण्याचे ठरवले आहे. आज ते भाजप मुख्यालयात भाजपच्या आमदारांसोबत राज्यातील राजकीय घडामोडीं बाबत चर्चा करून आपला अहवाल सादर करणार आहेत.
एम्समधील डॉक्टरांच्या निगराणीखाली पर्रिकरांवर उपचार, प्रकृती स्थिर : विश्वजीत राणे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Feb 2019 08:32 AM (IST)
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी रविवारी सकाळी आणि सायंकाळी गोमेकॉत भेट देऊन आढावा घेतला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनोहर पर्रिकर यांची प्रकृती आरोग्याच्या सर्व निकषांवर समाधानकारक असल्याचा दावा केला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -